माझ्या अनुभवातून शिकलेला उलटतपास: Art of Cross Examination of Witness in Criminal and Civil Cases

साक्षिदाराची उलटतपासणी किंवा उलटतपास ही एक कला आहे आणि ही कला अनुभवातून, निरीक्षण करून शिकता येते. तसेच उलटतपास ही कला महत्वाचे म्हणजे प्रत्यक्ष साक्षीदाराचा उलट तपास घेतल्याशिवाय शिकता येत नाही. त्यासाठी सर्वात महत्वाची बाब म्हणजे अभ्यास करावा लागतो. केसची खडणानखडा माहिती हवी असते. आरोपपत्रातील प्रत्येक पान केवळ नजरेखालून घालणे महत्वाचे नाही, तर त्याचा अभ्यासही करावा लागतो. माझ्या अनुभवातून शिकलेला उलटतपास: Art of Cross Examination of Witness ही पुढीलप्रमाणे आहे.
Cross-Examination in Criminal and Civil Cases

आपल्या पक्षकाराकडून साक्षिदाराचा पुर्वइतिहास, त्याचे चारित्र्य (बलात्कार, विनयभंग प्रकरणात मात्र महिलेला तीच्या चारित्र्याबाबत प्रश्न विचारता येत नाहीत) याचीही माहिती घ्यावी लागते. थोडक्यात साक्षीदाराला प्रश्न फिरवून विचारणे, साक्षिदारावर दबाव निर्माण करणे, ऐनवेळी प्रश्न सुचणे, साक्षिदाराने दिलेल्या उत्तरामधून प्रश्न निर्माण करणे, साक्षिदाराकडून आपल्याला हवे असलेले उत्तर मिळविणे अशी ही कला आहे.

Art of Cross Examination of Witness in Marathi Language या बाबतीत आता मी माझ्या अनुभवातून उलटतपासात कोणते प्रश्न विचारले पाहिजेत हे या ठिकाणी पाहूयात. आपल्या माहितीसाठी, साक्षिदाराच्या उलट तपासाबाबत भारतीय पुरावा कायदा 1872 च्या कलम 137 मध्ये तरतूद करण्यात आली आहे.

1. साक्षिदारावर पुर्ण नियंत्रण ठेवता आले पाहिजे. साक्षिदार आपल्या नियंत्रणात आला तर आपल्याला हवे ते उत्तर मिळवू शकतो. साक्षिदार आला आणि बाहेर निघून गेला असे होता कामा नये. (Commanding the witness)

2. साक्षिदाराला साधे, त्याल समजतील असे शब्द वापरून छोटे छोटे प्रश्न विचारले पाहिजेत. लांबलचक प्रश्न कधीच विचारले जावू नयेत. एका वाक्यात केवळ एकच प्रश्न असावा. (short questions and plain words)

3. साक्षिदाराला केवळ आणि केवळ उत्तर सूचक प्रश्नच विचारले पाहिजेत. उदा. आपण हिंगोलीत छत्रपती शाहू नगरात राहाता?, मारहाणीची घटना घडली त्यावेळी आपण शाळेत होता? असले प्रश्न. एखादवेळी सरळ प्रश्नही विचारले जावू शकतात. जसे की, आपण घटनेच्या दिवशी कुठे होता? घटना कधी घडली? असे प्रश्न. मात्र या प्रश्नांची संख्या कमी असावी. (Only and Only Leading Questions)

4. आपल्याला उत्तर माहिती नसलेले प्रश्न विचारु नयेत. उदा. एखाद्या खूनाच्या गुन्ह्यात एखाद्या साक्षिदारावर यापूर्वी गुन्हा दाखल झाला होता. यावेळी आपल्याला गुन्हा कधी दाखल झाला होता, कोणत्या कलमाखाली दाखल झाला होता, आदी माहिती असल्याशिवाय; तुमच्यावर खूनाचा गुन्हा दाखल आहे? असा प्रश्न विचारल्यास उत्तर नाही असे आले तर, आपल्याला त्या साक्षिदाराला गुन्ह्याचा एफआयआर दाखविता आला पाहिजे किंवा गुन्हा नंबर, केस नंबर सांगता आला पाहिजे. (Ask Questions of Which Answers we Know)

5. साक्षिदाराने दिलेले उत्तर व्यवस्थित ऐकून घ्यावे आणि त्यानुसार पुढील प्रश्न विचारावेत. म्हणजे साक्ष चालू असताना आपले साक्षिदाराच्या उत्तराकडे पुर्ण लक्ष असले पाहिजे. त्याशिवाय आपण त्याच्या उत्तरातून दुसरा प्रश्न तयार करू शकत नाही. (Listen Carefully Answers Given by the Witness)

6. साक्षिदाराने त्याच्या सरतपासात सांगितलेले प्रश्न उलटपतपासात विचारायचे नाहित. उदा. साक्षिदाराने त्याच्या सरतपासात सांगितले की घटनेच्या दिवशी मी सकाळी 9 वाजता रेल्वे स्टेशनकडे जात होतो. उलटतपासात, आपण त्याला, तुम्ही घटनेच्या दिवशी सकाळी 9 वाजता रेल्वे स्टेशनकडे जात नव्हते? किंवा घटनेच्या दिवशी सकाळी 9 वाजता आपण कुठे जात होते? असले प्रश्न विचारू नयेत. (Don’t ask questions, which he Deposed in Chief-examination)

7. साक्षिदाराशी वाद घालायचा नाही. वाद घातल्यास आपल्याला हवे ते उत्तर मिळत नाहीत आणि आपली प्रश्न विचारण्याची लिंकच तुटून जावू शकते. सरतपास चालू असताना मात्र, सरकारी वकीलाने उत्तरसूचक प्रश्न केल्यास आपण आक्षेप घेवू शकतो. यावेळी वाद झाला तरी काही प्रश्न नाही. थोडक्यात साक्षिदाराशी वाद घालायचा नाही. तर त्याची मानसिकता बिघडवायची आहे. (Disturb the Witness and Don’t Quarrel with Him)

8. सर्व साक्षिदारांना सारखेच प्रश्न विचारू नयेत. तसे केल्यास अगोदर साक्ष झालेला साक्षिदार बाहेर जावून किंवा दुसर्‍या दिवशी नंतरच्या साक्षिदारास काय काय प्रश्न विचारण्यात आले याबाबत सांगू शकतो. त्यामूळे एका साक्षिदाराला विचारलेल्या प्रश्नाची पुनरावृत्ती करायची नाही. आणि करायची असेल तर प्रश्नाचे स्वरूप बदलले पाहिजे, प्रश्न फिरवून विचारला गेला पाहिजे. उदा. पहिल्या साक्षिदाराला विचारण्यात आले की, घटनेच्या दिवशी सकाळी 9 वाजता अक्षय चाकू घेवून त्याच्या घराबाहेर फिरत होता? हाच प्रश्न दुसर्‍या साक्षिदारास विचारायचा झाल्यास, घटनेच्या दिवशी सकाळी 9 वाजता अक्षयकडे चाकू असल्याची बाब लोकांनी पोलिसांना सांगितली? असे विचारता येईल. (Avoiding Repeated Questions)

9. साक्षिदाराला प्रश्न विचारल्यावर प्रश्नाचे स्पष्टीकरण देण्याची संधी देवू नका. कारण स्पष्टीकरण दिल्यास मूळ प्रश्नाचा हेतूच नाहीसा होतो. उदा. तुमच्या कार्यकाळात तुमच्या गावातील नळयोजना बंद होती? असा प्रश्न विचारल्यावर त्याचे उत्तर हो, नाही किंवा माहिती नाही असेच यायला पाहिजे. साक्षिदाराने, स्वतःहून सांगितले की, माझ्या कार्यकाळापुर्वीच शासनानेच नळयोजना बंद केली होती. आणि हे उत्तर न्यायालयात नोंदले गेले तर आपला प्रश्न विचारण्याचा हेतूच नाहिसा होतो. (Don’t Give Opportunity to Witness to Give Clarification)

10. सरतपासात साक्षिदाराने सांगितलेल्या बाबींबाबत आपण नकारात्मक सूचना द्याव्यात. जसे की, आपण खोटी साक्ष देत आहात, आपण घटना पाहिलीच नाही, आम्ही वाहन चालवतच नव्हतो. (Giving Suggestions)

11. सरतपास चालू असताना साक्षिदाराने दिलेल्या जबाबात आणि फिर्यादीत, तपास टिपणात तफावत आली असल्यास त्याबाबतही प्रश्न विचारावेत. जसे की, आपण आता सांगितले आहे, की मी सकाळी 6 वाजता दररोज मैदानावर जात असतो आणि घटनेच्या दिवशी सुद्धा मी गेलो होतो. मात्र आपण तसे पोलिसांना तपासाच्या वेळी सांगितले नव्हते. याचे कारण सांगता येईल का? असे विचारल्यास साक्षिदाराच्या खरे बोलण्यावर संशय निर्माण केला जावू शकतो, त्याच्या विरोधाभासी जबाबावर प्रश्न चिन्ह निर्माण केला जावू शकतो. (Pointing out Contradictions) 

12. तसेच साक्षिदाराने फिर्यादीत, तपास टिपणात न सांगितलेली बाब सरतपासात सांगितली असेल तर त्यावरही प्रश्न विचारावेत. म्हणजे साक्षिदार खोटे बोलत असल्याची बाब निदर्शनास आणता येईल. (Pointing Out Omissions)
By- Adv. Raavan Dhabe, Hingoli.

Post a Comment

0 Comments

Ad Code